Thursday, March 26, 2026

परिमळ हा

अमेरिकेत यंदाचा वसंत ऋतू आला आणि हिवाळ्यात वठलेल्या जीर्ण झाडापेडांवर उमलू लागली ती नवी हिरवीगार पालवी आणि मधुर सुवासाने आकर्षित करणारी वासंतिक फुले पाहून मनात रुंजी घालू लागलाय तो...परिमळ हा...


Friday, February 27, 2026

आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

माय मराठीच्या उदरी  

माय मराठीच्या उदरी शब्दांचीच रत्ने, दरबारी रत्नांची खाण 

आमच्या माय मराठीच्या उदरी ना कशाची वाण 


उखाणे, श्लोक, म्हणी, अभंग, ओव्या,

सुभाषिते, गीते, नाटक, कथा, लावण्या किती गाव्या 


जिची साऱ्या विश्वी विराजे यश कीर्ति  

केले सालंकृत ज्ञानियाने, संतांनी ती ही माय मराठी


भक्तगण सच्चे आम्ही तिचे, भाग्य हे ललाटी

गातो, वाचतो, ऐकतो, जगतो मराठी, जगतो मराठी 


-सौ. मेधा श्रीश कामत,

२७ फेब्रुवारी २०२६, मराठी भाषा गौरव दिन   

Wednesday, November 5, 2025

लक्ष लक्ष ज्योति

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज सादर करत आहोत अंतरीच्या दिवाळीची आणखी एक कविता.. लक्ष लक्ष ज्योति

काव्य रचना: सौ. मेधा श्रीश कामत

लक्ष लक्ष ज्योति

आज त्रिपुरारी लावूया लक्ष लक्ष वाती

लखलखले विश्व, लक्ष लक्ष ज्योति

          पणती पहा इवलीशी उजळे प्रकाश

          करी जागृत संवेदना मनामनात संदेश

उजळूनीया दशदिशा तम लोपवी

देई प्रेरणा सकला स्वसामर्थ्ये तोषवी

          भरुनीया वाहे काठोकाठ आनंदे  सरीता

          आसमंत हर्षभरीत आरास ही पाहता

ना चिंतेचा मग मना लवलेश शिवे

जेव्हा विवेके  लावितो लक्ष लक्ष दिवे

          उजळता दिवे रोमरोम होई पुलकित

          प्रकटे नारायण येई अधिक सन्निध

शोभे नभीचा आकाशदीप तेजोमय

अवनीवरी नाचे हर्षॉल्हास आनंदमय

          करी क्रिडा दीपलक्ष्मी देई वरदान  

          सौन्दर्य सृष्टीचे, तेजाची की उधळण

सुसंस्कारे मायपित्याच्या करीतो आम्ही साजरे सण

भक्तित परमपित्याच्या होतो सदा रममाण

-                                                                       --सौ. मेधा श्रीश कामत 

Tuesday, April 9, 2024

तेजोमय गुढीपाडवा

 बुकमाया परिवारातर्फे मराठी वर्षप्रतिपदेच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

ह्या नववर्षारंभानिमित्ताने सादर करत आहोत कविता "तेजोमय गुढीपाडवा"

नव्या पहाटे फाकली नवी उषःप्रभा,

तेजाळत दशदिशा भूवरी उजळीत नभा ||

नववर्षाचे स्वागत करुनि थोरांसी वंदन,

बांधूनी मांगल्याचे दारी तोरण ||

विवेकाची गुढी चढविली अंबरी,

सजविली पताका सदाचाराची घरोघरी ||

नवोदय केला साजरा नववर्षाचा,

सण तेजोमय गुढीपाडवा हर्षोल्हासाचा ||

नव्या पर्वाची आस जनी उत्साह नवा,

गाभारी मनाच्या तम सरो, प्रकाश नवा || 

रुजवूनी प्रेम स्नेह वाढवू नात्यात गोडवा,

गोड ह्या सणाचा आनंद सदा लाभावा ||

जोडोनिया कर दोन्ही ईशचरणी,

तेज सद्भक्तिचे उफाळो केली आळवणी ||


-सौ. मेधा श्रीश कामत

Saturday, March 30, 2024

कविता - रंगपंचमीस साक्ष


रंगपंचमीनिमित्त हार्दिक शुभेच्छांसह सादर करीत आहोत कविता "रंगपंचमीस साक्ष"

रंगपंचमीस साक्ष उभा सत्पुरुष प्रत्यक्ष,
शेला पांघरूनी केशरी फुलांचा पळस वृक्ष || 
गरम हवा उष्ण झळा सोसवेना,
फेरा ऋतुचक्राचा उन्हाळा साहवेना || 
मन होता निरस विषण्ण उदास,
उन्हामाजी उभा पळस प्रफुल्लीत करी त्यास || 
केशरी उधळण अहा फुलांची आरास, 
पाहता पळस असा पळे हो आळस || 
उत्सव होळीचा रंगपंचम करीतसे दंग,
केशरी कुसुमांचा पळसाच्या, बनविता रंग || 
झळाळी पाहता ही आनंदती लोचन,
हरखूनी नाचे मन होऊनी उन्मन || 
देवाजीची किमया सारी सोनसळा तेजोमय,
दिव्यत्व वातावरणी उजळे ज्योतिर्मय || 
                 - सौ. मेधा श्रीश कामत