Tuesday, December 31, 2019

शोधीत पाऊलखुणा

शोधीत पाऊलखुणा
रोजचाच तोच तुडवित रस्ता
रोजच्याच ह्या पायवाटा
हातात घेऊनी हात सख्याचा
घेत मागोवा सरत्या वर्षाचा
शोधीत चालले मी पाऊलखुणा
क्षणक्षण आठवित वेचीते कणाकणा
दिनरात देशील ना रे तू साथ
राहू दे हातात तुझाच रे हात
रोजच्याच नाही परि अपरिचित
नेतील सत्वरी परतीच्या पथावरी अवचित

-सौ. मेधा श्रीश कामत



                    


Friday, March 15, 2019

नंदादीप

नंदादीप
देहाच्या कुडीत
पंचप्राणांचा विसावा
मनाच्या गाभारी
बुद्धीचा दिवा दिसावा


त्यात जो घालेल
विचारांचे तेल
सारासार निर्भेळ,
नको घालमेल

भिजवाया त्यात
जो थोडा वेळ
अहंभावाची वात
हसत वळेल

विवेकी भावनेचा
खडा जो घासेल
स्फुल्लिंग ज्ञानाचं
त्यातून चेतवेल


जव मी पणा जळेल
तव मायामोह गळेल
स्वार्थ सारा सरेल
चिद्शक्ती उमलेल


त्याच्या ठायी प्रकाशेल
नवल की उलगडेल
उजेडात त्याला अनंताचे
आत्मदर्शन घडेल


मग स्वतःचे स्वतःशी
संधान जुळेल
भेटता त्यासी त्याची
खूणगाठ ही पटेल


नंदादीप हा जेथ तेवेल
भय ते अवघे नुरेल
तम तळी चैतन्यवेल
तेथ दिवाळी उजळेल


-सौ. प्रीति कामत-तेलंग

                    


Wednesday, February 27, 2019

बुकमाया परिवारातर्फे तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!


मराठीचे थोर सुपुत्र , कविवर्य कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन करुन आजच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सर्व मराठी भाषा प्रेमींसाठी मनःपूर्वक शुभेच्छांसह “मराठी भाषेचे मनोगत” सांगणारी माझ्या आईने (सौ. मेधा कामत) रचलेली ही कविता सहर्ष सादर करतेय:
मी मराठीमाता  

विश्वाची ह्या, सालंकृत मी मराठीमाता
उत्कर्षे  तुमच्या खुलूनी येई माझी चारुता

संतमहंत आणि थोर विद्वज्जन
लेकरे माझी ती, करती प्रबोधन

ऐकूनी त्यांची विजयगाथा
सुखवे अंतरी माझा पान्हा

धन्य मी थोरवी लेकरांची ऐकता
लेकुरवाळी मी कुटुंबवत्सल माता

पाठ फिरवूनी गेलात दुर्लक्षून जर
आशेने पाहू कोणाकडे सांगा तर

रंगमय रसमय कूस माझी समृद्ध
नसांतूनी वाजे ताल लय आणि नाद

वाढविण्या साज माझा झटती जे आजही
यशोदालने खुली त्यांना अन् दिशा दहाही

जयजयकारे तुमच्या तळपे माझे तेज
पुण्यवान मी, कृतार्थ मी, भाग्य हेच

का?  कशास होऊ मी दीनवाणी?
वर्षाव यशाचा, माझे हृदयी अमृतवाणी

शब्दसुमनांचा फिरवूनी विशाल कुंचला
माझी मुले देती मला नवा तजेला

हेवा करोत कोणी माझ्या वैभवाचा
ऐश्वर्यसंपन्न मी, हात नित्य आशीर्वादाचा

तळपत रहाती जोवरी चंद्रसूर्य
चिरकाल खुलेल माझे हे सौंदर्य  
-सौ. मेधा श्रीश कामत
बोरीवली (पूर्व)
मुंबई