श्रवणीय कथा (Audio Stories)


श्रवणीय कथा 

१. टिल्लु आला रे -(खास बालदोस्तांसाठी)



टिल्लु आला रे

व्हर्जिनिया हे अमेरिकेतील एक राज्य आहे. रिचमंड हे व्हर्जिनियाच्या राजधानीचे शहर आहे . ह्याच रिचमंड शहरात आम्ही राहतो. आमच्या शहरात एक मोठा तलाव आहे.  हा तलाव वेस्टहँप्टन तलाव  या नावाने  ओळखला जातो. विविध जातींचे मासे, कासवे व बदकांचे वेस्टहँप्टन तलाव  हे वसतिस्थान आहे .  ह्या तलावाकाठी आमची एक छोटीशी बाग आहे. वसंत ऋतुत आम्ही आमच्या बागेत  मटार, बटाटे , वांगी , टॉंमेटो, मिरच्या, पालक, मेथी अशा भाज्या लावतो. तर झेंडु, गुलाब, शेवंती अशी फुलझाडंही आम्ही लावतो.

यावर्षी आम्ही आमच्या बागेत कोथिंबीर लावायचं ठरवलं. कोथिंबीरीच्या बियांना ‘धणे’ असं म्हणतात. धण्यांची पूड भारतीय मसाल्यांमध्ये नेहमी वापरतात. तर आम्ही हे धणे दुकानातून खरेदी केले. घरी आल्यावर मी वाटीभर पाण्यात मुठभर धणे रात्रभर भिजत घातले. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व बियांना कोंब आलेले दिसले. मग मी ते अंकुरलेले धणे पाण्यातून काढून एका कागदी रुमालात गुंडाळले. त्या रुमालाची घडी एका छोट्याशा कागदी पिशवीत ठेवली.  ती पिशवी, कुदळ आणि  फावडे अशी अवजारे सोबत घेऊन आम्ही आमच्या बागेत गेलो.

मला तो दिवस आजही आठवतोय. दिनांक २० एप्रिल २०१४ चा दिवस होता तो. त्यादिवशी रविवार होता. सकाळी आम्ही बागेत गेलो तेव्हा ढगाळ वातावरण होतं. वेधशाळेने पावसाळी हवामान अंदाज वर्तवलेले होते म्हणून आम्ही आमची छत्री सोबत घेतली होती. बागेत शिरल्यावर आम्ही ती छत्री एका बाजूला ठेवून दिली आणि आम्ही बागकाम करु लागलो. आम्ही एका बाजूला मातीत  खणून तिथे धणे पेरले, वरून कंपोस्ट खत आणि मातीने झाकून टाकले आणि थोडे पाणी शिंपडले. अचानक विजांचा कडकडाट सुरु झाला. “ आता पाऊस सुरु होईल त्याआधी आपण घरी जाऊया” असं माझा नवरा नकुल म्हणाला. लगेच त्याने सगळी अवजारे पिशवीत भरली आणि  तो छत्री घेण्यासाठी कडेला वळला. तेवढ्यात हाताच्या करंगळीएवढ्या आकाराचं एक कासवाचं पिल्लू  त्या बंद छत्रीवर चढून बसलेलं मी पाहिलं. काळ्या रंगाच्या छत्रीवर हिरव्या रंगाचं त्याचं पाठीवरील कवच आम्हाला दिसत होतं. विजांच्या आवाजाला घाबरून आणि थंडीने गारठून त्या छोट्या पिल्लाने आमच्या छत्रीचा आसरा घेतला होता. आम्ही दोघांनी त्या पिल्लाला घरी न्यायचं ठरवलं. मग नकुलने त्याला छत्रीवरुन उचललं आणि ज्या कागदी पिशवीतून आम्ही धणे नेले होते त्या पिशवीत अलगद ठेवलं. ते कासवाचं पिल्लू भीतिने भेदरलं होतं म्हणून त्यानं त्याची मानसुद्धा त्याच्या पाठीवरील कवचात मिटून घेतली होती. त्याला पिशवीत ठेवताना नकुलने मला विचारलं , “अगं प्रीति, ह्याचं नाव काय ठेवुया आपण ?” मी म्हटलं,“ केवढं छोटंसं आहे ते पिल्लू. आपण त्याला म्हणुया टिल्लु.” आणि त्यादिवशी टिल्लु आमच्या घरी आला आणि  आमच्यासोबत राहू लागला.  

- प्रिती तेलंग 

No comments:

Post a Comment