Friday, March 15, 2019

नंदादीप

नंदादीप
देहाच्या कुडीत
पंचप्राणांचा विसावा
मनाच्या गाभारी
बुद्धीचा दिवा दिसावा


त्यात जो घालेल
विचारांचे तेल
सारासार निर्भेळ,
नको घालमेल

भिजवाया त्यात
जो थोडा वेळ
अहंभावाची वात
हसत वळेल

विवेकी भावनेचा
खडा जो घासेल
स्फुल्लिंग ज्ञानाचं
त्यातून चेतवेल


जव मी पणा जळेल
तव मायामोह गळेल
स्वार्थ सारा सरेल
चिद्शक्ती उमलेल


त्याच्या ठायी प्रकाशेल
नवल की उलगडेल
उजेडात त्याला अनंताचे
आत्मदर्शन घडेल


मग स्वतःचे स्वतःशी
संधान जुळेल
भेटता त्यासी त्याची
खूणगाठ ही पटेल


नंदादीप हा जेथ तेवेल
भय ते अवघे नुरेल
तम तळी चैतन्यवेल
तेथ दिवाळी उजळेल


-सौ. प्रीति कामत-तेलंग

                    


No comments:

Post a Comment