Monday, March 31, 2014

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. या दिवशी घरातील वडिलधारी व्यक्ति गुढी उभारते व इतर सर्वांसह मनोभावे वंदन करून आनंदोत्सव साजरा करते.
गुढीसाठी  वेळूची, बांबूची मोठी काठी धुवून स्वच्छ करतात. नंतर तिच्या एका टोकावर रेशमी वस्त्र घालून त्यावर चांदीचे / पितळेचे / तांब्याचे कलशाच्या आकाराचे भांडे पालथे घालतात. त्यावर कडूनिंब पाला , झेंडू, चाफा अशा फुलांच्या माळा व साखरेची माळ त्यावर बांधतात. ही गुढी अंगणात किंवा उंच जागी उभारतात.
शक्य नसल्यास खिडकीत लावतात. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. हल्ली घरातल्या घरात प्रतीकात्मक म्हणून छोटी गुढी ही उभारतात. एकमेकाला भेटवस्तू म्हणूनही अशी गुढी देतात. गुढीला बांधलेला कडूनिंबाचा पाला व साखरेची माळ जीवनातील कडूगोड प्रसंगांना हसत हसत सामोरे जाण्याची शिकवण देतात. ही शिकवण मनावर बिंबावी म्हणूनच काही भारतीय कुटुंबांत सकाळी कडूनिंबाची काही पाने खाण्याची पद्धत आहे. 
गुढीपाडवा हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस तर आहेच. तसेच तो हिंदू पंचागातील साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी पहिला पूर्ण मुहूर्त असल्यामुळे हा गुढीपाडव्याचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. 

प्राचीन भारतीय पौराणिक परंपरेनुसार ब्रह्मदेवाने केलेल्या जगाच्या निर्मितीनंतर काल गणनेला याच दिवशी सुरुवात झाली. म्हणून गुढीला ब्रम्हध्वजा असेही म्हणतात. श्रीरामाला राज्याभिषेक करण्यात आला तो याच दिवशी. त्या आनंदात अयोध्येत सर्वत्र गुढ्या उभारण्यात आल्याचे उत्तर रामायणात म्हटले आहे. 

ऐतिहासिक संदर्भानुसार, इसवी सनानंतर ७८ वर्षांनी,शालिवाहन (सातवाहन) राजाने भारतावर शक टोळ्यांनी केलेले आक्रमण यशस्वीपणे परतवून लावले आणि शकांच्या पराभवाचे स्मरण राहावे म्हणून यादिवशी 'शालिवाहन शक' ह्या नवीन सनाचा प्रारंभ केला. 
तर असा हा गुढीपाडवा आणि येणारे नविन वर्ष आपणा सर्वांना आनंदाचे, सुदृढ आरोग्यमय आणि  भरभराटीचे जावो हीच सदिच्छा !




No comments:

Post a Comment