Tuesday, February 27, 2018

बुकमाया परिवारातर्फे तुम्हा सर्वांना मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!

बुकमाया परिवारातर्फे तुम्हा सर्वांना मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!

आज २७ फेब्रुवारी..आज ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक आणि कविवर्य कै. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. ह्या प्रतिभावंताने आपल्या कर्तृत्वाने मराठी साहित्यात अत्यंत मोलाची भर घातली आहेच. त्याही पुढे जाऊन मराठी भाषेला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरांवर महत्वाचे स्थान मिळावे याकरिता त्यांनी निर्भीडपणे मांडलेले विचार आणि खेडोपाडी मराठीची गोडी रुजविण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम खरोखरच मौल्यवान आहेत. दरवर्षी त्यांच्या जन्मदिवशी आपण सर्व मराठी जन 'मराठी भाषा दिवस' आनंदात साजरा करतो हा जणू मराठी भाषेचाच गौरव आहे. मराठीच्या ह्या सुपुत्राला विनम्र अभिवादन !! मराठी भाषा दिनानिमित्ताने सादर करत आहोत एक काव्यपुष्प...

कविता : मायबोली मराठी मी
कवयित्री: सौ. मेधा श्रीश कामत
काव्यवाचन : सौ. प्रीति तेलंग   


मायबोली मराठी मी

मायबोली मराठी मी, कळवळून ना मारीत हाका,
नाही मी दुर्बल, प्रसंग मात्र तुम्हांवर बाका

अमृत प्राशून माझे, तुम्ही घडला विद्वान थोर
जीवनरस तो अक्षय पिऊनी, आता का होता निष्ठूर?  

मार्ग ना दाविला, करतील काय पांथस्थ ?
घृणा ही ना स्वतःची, ना वाटे तुम्हा खंत ?

आठवा ती नररत्ने, ती स्फूर्तिस्थाने,
गाऊनी कवने, पोवाडे, केली जागृति त्यांनी लेखणीने  

होऊनी दुर्बल नका ओढवू विकोप विनाशक,
तुम्ही अनुयायी थोरांचे, तुम्ही ज्ञानाचे साधक

बंधमुक्त झालात शृंखला परक्यांच्या तोडूनी,
आज ते ही गाती थोरवी माझी माझ्या चरणी

करा तुम्हीही यत्न -प्रयत्न, नको मज नैवेद्य आणि धुप
उभी सामोरी मी अभिजात, मूर्त सालंकृत रुप

ही तळमळ अंतरीची होऊनी प्रबळ, सावरेल जेव्हा एकमेकां,
वाजू  द्या नगारे - दुंदुभी, आता जयजयकार माझा ऐका

-सौ. मेधा श्रीश कामत


                    

No comments:

Post a Comment